सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

अभिमान आहे मला मराठी असण्याचा...

मराठी भाषेची एक परंपरा आहे आणि या परंपरेने आपल्याला बरेच काही दिलेले आहे, सर्वगुणसंपन्न केले आहे. या मातीचे, या मातीतील माणसांचे ऋण आपण कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही. पण एक काम मात्र करू शकतो, त्यांचा हा वसा जोपासण्याचे, त्याला पुढे नेण्याचे.
अभिमान आहे मला मराठी असल्याचा.. गर्व म्हणालात तरी चालेल.. का असू नये मला माझ्या भाषेचा अभिमान.. ज्या भाषेमुळे मी लिहायला, वाचायला शिकलो, घडलो, रूजलो, फुललो, बहरलो, मुरलो त्याचा अभिमान मला असायलाच हवा.. त्याउपर माझ्या मराठीतील महान व्यक्तींनी केलेले कार्य, त्यांचे विचार, दृष्टीकोन, संस्कार हे सारे संचित पाहिले तर आपण कुणापेक्षाही कमी नाही, उलटपक्षी वरचढ आहोत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. गुलामगिरी झुगारून स्वतंत्र होण्याची संकल्पना मांडली ती छत्रपती शिवाजी महाराजांनीच ना, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा त्यांनी फक्त विचारच केला नाही तर ते आपल्याला करून दाखवलेही त्यांचे गोडवे, पोवाडे गाऊ तितकेच कमी आहे. त्यांना लाभलेले मराठी मावळेही तितकेच महान. कारण एका माणसासाठी सारे काही झुगारून देण्याची वृत्ती त्यांनी दाखवली आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले.
महाराष्ट्राला संतांचीही मोठी परंपरा आहे, त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ आजही आपल्या मनाला स्पर्शून जाणारी आणि विचार करायला लावणारी. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, बहिणाबाई ते गाडगेबाबांपर्यंत. त्यांचे विचार हे आजही आपल्याला स्फुर्ती देणारे, चिरतरुण असेच. काळ कोणताही असो, त्यांचा प्रत्येक शब्द आजही आपल्यासाठी लागू पडतो.
भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते बाबासाहेब आंबेडकर हे मराठीच ना, त्यांनी राज्याला नाही, तर देशाला दिशा दिली. मग सांगा, मराठी माणूस संकुचित वृत्तीचा कसा काय असू शकतो. ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांच्यामुळे तर आपण शिक्षण घेऊ शकतोय. टिळक, आगरकर, सावरकर या आणि यांच्यासारख्या अनेक महान मराठमोळ्या व्यक्तींमुळेच तर आपण स्वतंत्र उपभोगू शकतोय. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला तो मराठमोळ्या आनंदीबाई जोशी यांनीच ना.
आज जे बॉलीवूड नावाने प्रसिद्ध आहे त्याची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळक्यांनीच रोवली. दुर्गाबाई खोटेंपासून ते नाना पाटेकर पर्यंत आजही मराठी माणसाने आपला ठसा चित्रपटसृष्टीतही उमटवलेला आहे आणि ही पावले आता हॉलीवूडच्या दिशेने निघालेली आहेत. ‘श्यामची आई’, ‘श्वास’ ऑस्करवारी करुन आले आहेत. ‘जोगवा’ सारखा मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची लयलूट केली आहे. बिग बी अमिताभ बच्चनलाही ‘विहीर’ सारखा मराठी सिनेमा काढावासा वाटतो. आपला पहिला‘मिफ्टा’ ही दुबईत झाला, अजून काय हवंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा