मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

अ‍ॅनिमेटेड प्रभो शिवाजी राजा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं विलक्षण कर्तृत्व अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येतंय. इन्फिनिटी व्हिज्युअल्स व मेफॅक यांनी ‘प्रभो शिवाजी राजा’ या शंभर मिनिटांच्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट वास्तव वाटावं यासाठी गेल्या दोन वर्षापासून या टीमने अपार कष्ट घेतलेत. सचिन खेडेकर यांच्या ओघवत्या शैलीतल्या निवेदनातून हा चित्रपट उलगडत जाणार असून यात महाराजांच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे टप्पे दाखवण्यात आले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निनाद बेडेकर यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे, डच चित्रकाराने त्या काळात काढलेल्या महाराजांच्या मूळ चित्राबरहुकूम महाराजांची अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखा तयार करण्यात आलीय. चित्र व रेखाचित्र यांच्या परंपरागत अ‍ॅनिमेशनचा व संगणकीय अ‍ॅनिमेशन तंत्राचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळेल, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश मुळे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या चमूने तब्बल दोन वर्ष सतत मेहनत करून या चित्रपटाचं अनिमेशन अंतिम स्वरूप दिलंय. या चित्रपटासाठी यातल्या ३० महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची तब्बल पावणेतीन लाख चित्रं काढण्यात आली होती. तसंच नऊ हजारांहून अधिक पार्श्वभूमींचा वापर करण्यात आलाय. पडद्यावर काही सेकंद दिसणारी फ्रेमही परीपूर्ण असावी, असा प्रयत्न या चित्रपटासाठी करण्यात आलाय. भरत बलवली यांनी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची बाजू सांभाळली असून कवी भूषण यांच्या कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठयांनाही आनंद व प्रेरणा देऊन जाईल, असा विश्वास या चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा