गुरुवार, २५ जुलै, २०१३

मराठी बाना - अतुल कुलकर्णीला दक्षिणेतला फिल्मफेअर

'नटरंग', 'वळू', 'चांदनी बार', 'हे राम' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणा-या अतुल कुलकर्णी याला दक्षिणेतल्या मानाच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 'इडिग्रीके' (धैर्य) या कानडी चित्रपटातील भूमिकेसाठी अतुलला सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

काल (शनिवार) संध्याकाळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत हैदराबाद येथील इंटरनॅशनल कॉनव्हकेशन सेंटरमध्ये ६० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कानडी, तेलगू, तामीळ, मल्याळम सिनेमातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अतुलला सुमिर किट्टीर दिग्दर्शित आणि अग्नि श्रीधर यांच्या 'इडिग्रीके' (Edegarike) या कादंबरीवर आधारीत सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला. 'इडिग्रीके' सिनेमामध्ये अतुलने खून्याची भूमिका साकारली आहे.

मंगळवार, २३ जुलै, २०१३

मराठी डॉक्टर

लंडन- ब्रिटिश युवराज्ञी केटचे बाळंतपण करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकात मराठी डॉक्टरचाही समावेश होता. लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयातील डॉ. सुनीत विनोद गोडांबे असे या मराठमोळ्या डॉक्टरचे नाव आहे. दरम्यान, नवजात प्रिन्सला पाहण्यासाठी जगभरातील लाखो लोक आतुर आहेत. एवढेच नव्हे, बाळाचे नाव काय असेल यावरही सट्टा लावला जात आहे.
ब्रिटिश राजघराण्यातील पाहुण्याबद्दल जगभरात उत्सुकता होती. केम्ब्रिजची राजकुमारी केटच्या बाळंतपणासाठी महाराणी एलिझाबेथ (द्वितीय)चे माजी प्रसूतितज्ज्ञ मार्कस सेशेल यांच्या नेतृत्वाखाली सेंट मेरी रुग्णालयातील तज्ज्ञांचे खास पथक तयार होते. यात नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. गोडांबे यांच्यासह गाय थोर्प, अ‍ॅलन फार्दिंग यांचा समावेश होता.     
2013 चांदीची नाणी
शाही बाळासोबत याच दिवशी जन्मलेल्या 2013 बाळांना शाही घराण्याच्या वतीने भेट म्हणून चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. यासाठी पालकांना facebook.com/theroyalmint या वेबसाइटला भेट देऊन आपल्या बाळाच्या जन्मतारखेची जन्माच्या अधिकृत दाखल्यासह नोंदणी करावी लागेल. यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एका नाण्याची किंमत 28 पाउंड आहे.