मंगळवार, २१ मे, २०१३

मराठमोळ्या इशानंमुले फक्त 30 सेकंदात तुमचा मोबाईल चार्ज

दिवसभर कामाच्या धावपळीत असणा-यांसाठी मोबाईल किती गरजेचा आहे हे सांगायला नको...मात्र इंटरनेटपासून सगळ्या गोष्टी मोबाईलवर वापरणा-यांसाठी व्याप असतो तो वेळ काढून मोबाईल चार्ज करण्याचा...पण तुमचा स्मार्ट मोबाईल फोन फक्त 20 सेकंदात चार्ज होईल असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... 
अर्थातच तुमचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य केलं आहे कॅलिफोर्नियात राहणा-या मराठमोळ्या इशा खरेनं....फक्त 20 ते 30 सेकंदात तुमचा मोबाईल पूर्णपणे चार्ज करु शकेल अशा सुपर कपॅसिटर उपकरणाचा शोध लावलाय 18 वर्षीय ईशा खरेनं...भारतीय-अमेरिकन असलेल्या ईशाला तिच्या या शोधासाठी इंटेल फाऊंडेशनच्या `यंग सायंटिस्ट अवॉर्ड`ने गौरवण्यात आलंय. या कामगिरीबद्दल तिला इंटेलकडून 50 हजार डॉलर्सचं पारितोषिक मिळालं आहे...त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गूगलनेही तिच्या या क्रांतीकारी संशोधनाची दखल घेतलीय. 
ईशाच्या या उपकरणाचं आयुष्य 10 हजार चार्ज-रिचार्ज सायकल एवढे आहे. सध्या या कपॅसिटरच्या चाचण्या सुरु आहे...लवकरच तो मोबाईल आणि अन्य उपकरणांसाठी वापरता येणार आहे....

कसा आहे सुपर-कॅपॅसिटर? 

अत्यंत लहान आकाराचा हा सुपर-कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज डिव्हाइस असून तो मोबाइलच्या बॅटरीमध्ये बसवता येतो. अत्यंत कमी जागेत भरपूर ऊर्जा साठवून ठेवण्याची, चटकन चार्ज करण्याची क्षमता ही या सुपर-कॅपॅसिटरची वैशिष्ट्ये आहेत.

शनिवार, ११ मे, २०१३

करोडपतीचं मराठी स्वप्न!


छोटा पडदा आता इतका मोठा झालाय की, त्याने सर्वसामान्यांचं जीवनच व्यापून टाकायला सुरुवात केलीय. त्याला वेगवेगळी स्वप्नं दाखवायला सुरुवात केलीय. मग ते आपल्यात दडलेले कलागुण दाखवून मशहूर होण्याचं स्वप्न असो की, नशिबाचे अचूक फासे टाकून आपलं आयुष्य बदलून टाकण्याचं स्वप्न असो. असंच करोडो रुपये जिंकण्याचं एक स्वप्न दाखवलं ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने. ‘हू वॉण्टस् टु बी अ मिल्येनर’ या सर्वप्रथम ब्रिटनमध्ये छोटया पडद्यावर अवतरलेल्या आणि गाजलेल्या टीव्ही शोची ही भारतीय आवृत्ती. जगभर लोकप्रिय ठरलेला हा कार्यक्रम आता मराठीत आलाय. ‘ई टीव्ही’ मराठीवर ‘कोण होईल मराठी करोडपती’  करोडो रुपये कमावण्याचं स्वप्न आता मराठी साज लेवून घेऊन साकार होणार आहे.
              श्रीमंत व्हावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु श्रीमंत होण्यासाठी काहीही करायची तयारी असली तरी सगळ्यांनाच काही श्रीमंत होता येत नाही. कारण श्रीमंतीचा काही पुस्तकी मंत्र नसतो. परंतु तशी संधी एखादा टीव्ही कार्यक्रम पाहून मिळत असेल, तर श्रीमंत होण्याचा याहून सोपा मार्ग कुठला? काही वर्षापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ने पहिल्यांदा प्रेक्षकांना करोडपती होण्याचा हा मार्ग दाखवला.

तो सोपा नव्हताच. कारण तिथे पणाला लागणार होती बुद्धिमत्ता. थोडासा नशिबाचा भाग आणि ही बुद्धिमत्ता यांची सांगड ज्यांना साधली त्यांच्यासाठी हा मार्ग भाग्योदयाकडे घेऊन जाणारा रस्ता ठरला. केवळ काही प्रश्नांची उत्तरं देऊन हा भाग्योदय करणा-या या कार्यक्रमाने साहजिकच लोकप्रियतेचीही ‘श्रीमंती’ मिळवली.

खरं तर ‘सोनी’ चॅनेलवरून सादर होणारा हा कार्यक्रम ‘हू वाँण्टस् टु बी अ मिल्येनर’ या मूळ ब्रिटनच्या कार्यक्रमाची भारतीय आवृत्ती होती. १९९८ साली ‘सोनी पिक्चर्स असोसिएशन’ या ब्रिटिश कंपनीने या अभिनव आणि अत्यंत वेगळ्या टीव्ही शोची निर्मिती केली. ४ सप्टेंबर १९९८ या दिवशी तो ‘आय टीव्ही’ या वाहिनीवरून पहिल्यांदा प्रसारित झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे तो जगभरातल्या अनेक देशांतील छोटया पडद्यावर अवतरला. आजवर वीसहून अधिक देशांमध्ये ‘हू वॉण्टस् टू बी अ मिल्येनर’ या कार्यक्रमाचे देशी अवतार सादर झालेत.

भारतात ‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं सत्र २००० साली भारतात सादर झालं. सूत्रसंचालकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी पार पाडली. अमिताभ बच्चन यांचं अनौपचारिक तेवढंच बुद्धिशाली सूत्रसंचालन या कार्यक्रमाचा युएसपी ठरलं. हर्षवर्धन नवाथे या मराठी तरुणाने ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला. आपल्या पहिल्याच सत्रात या कार्यक्रमाने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. हर्षवर्धन नवाथेचा एपिसोड सादर झाला त्या त्यादिवशी तो कोटीमोलाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार, याची सगळ्यांना उत्सुकता होती. (‘स्लमडॉग मिल्येनर’ या चित्रपटात ही वातावरणनिर्मिती छान करण्यात आली आहे.) शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हर्षवर्धनने दिलं, तेव्हा अमिताभ म्हणाला होता ‘यु मेड हिस्ट्री’.

मराठी तरुणाने लिहिलेल्या इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे. कारण ‘हू वॉण्टस् टु बी अ मिल्येनर’ किंवा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची मराठी आवृत्ती झळकणार आहे. ‘कोण होणार मराठी करोडपती’ या नावाने ६ मे पासून हा कार्यक्रम ‘ई टीव्ही’ मराठी वाहिनीवर दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठी सिनेमाचा सुपरस्टार सचिन खेडेकर सांभाळणार आहे.

‘कोण होईल मराठी करोडपती’चं स्वरूप मूळ कार्यक्रमाप्रमाणेच असून यातले प्रश्न मात्र मराठीत विचारले जाणार आहेत. मराठी लिहिता-वाचता येणा-या कुणालाही या कार्यक्रमात भाग घेता येईल. प्रश्नांच्या टप्प्याप्रमाणे पाच हजारांपासून ते एक कोटी रुपये स्पर्धकाला मिळतील. हिंदी कार्यक्रमात लोकप्रिय झालेल्या काही शब्दांसाठी मराठी प्रतिशब्दही तयार करण्यात आलेत. हा कार्यक्रम घडय़ाळाच्या काटय़ांवर चालत असल्याने त्याला ‘काटेकर काका’ असं नाव देण्यात आलंय.

बक्षिसाच्या रकमेच्या भाजणीला ‘पैशांचं झाड’, तर ‘लॉक कर दिया जाय’ऐवजी ‘शिक्का मारू?’ असा शब्द वापरण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या मदतीसाठी तीन लाइफलाइन अर्थात जीवनदायिनीही आहेत. परिचिताला फोन करून प्रश्न विचारण्याची ‘फोन अ फ्रेंड’ (मित्राची मदत) तसंच ‘फिफ्टी फिफ्टी’ (तळयात मळयात) ही जीवनादायिनीही आहे. प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेल्या चार पर्यायांपैकी दोन चुकीचे पर्याय निघून जाण्याची सोय आणि नेहमीचा ‘ऑडियन्स पोल’ म्हणजे ‘जनमताचा कौल’ही स्पर्धकाला घेता येणार आहे.

'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही!

सर्बियन , व्हिएतनामीपासून कन्नड , तामिळ , बंगाली ,तेलगूपर्यंत भाषा समजून घेणा-या गुगल ट्रास्लेटरला मराठी का कळत नाही ? असा प्रश्न आजवर अनेकदा विचारला गेला. इंटरनेटवर त्यासाठी अनेकांनी मोहीमाही राबविल्या. या सर्व मागण्या अखेर पूर्ण झाल्या आणि गुगलची भाषांतर सुविधा असेलेले ' गुगल ट्रान्स्लेटर ' अखेर मराठीतही अवतरले. 

गुगल मराठी ट्रान्सलेटर 

मराठीसह बोस्नियन , सेबियानो , हमाँग , जॅव्हेनिज या पाच नव्या भाषांसह एकूण ७० भाषांमध्ये गुगल ट्रान्स्लेटर म्हणजेच गुगलची भाषांतर सुविधा सज्ज झाली आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमधून त्याची घोषणा केली असून , मराठीसाठी अद्यापही ही सुविधा प्रथामिक स्थितीत असल्याचेही कबूल केले आहे. 

या आधी बंगाली , गुजराती , हिंदी , कन्नड , तामिळ , तेलगू , उर्दू या भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. पण जगभरातील सुमारे सात कोटी तीस लाख लोक जी भाषा बोलतात ती मराठी मात्र गुगल ट्रान्सलेटरवर उपलब्ध नव्हती. आपली ही कमतरता गुगलने भरून काढली आहे. आता ' गुगल ट्रान्स्लेटर ' वर मराठीतून अन्य ६९ भाषा किंवा त्या ६९ भाषांमधून मराठीत भाषांतर करता येणे शक्य झाले आहे. 

अन्य भाषांप्रमाणेच मराठीत होणारे हे भाषांतर किंवा मराठीतून होणारे भाषांतर अचूक नाही. अद्यापही ही सुविधा प्राथमिक अवस्थेत असल्याने अचूक असण्याची अपेक्षा करणे बरोबर नाही. पण किमान ही सुविधा सुरू होणे महत्त्वाचे होते. आता ती अचूक करण्याची जबाबदारी मराठीप्रेमींनीही उचलावी , अशी गुगलची अपेक्षा आहे. 

आजही अनेक वाक्यांचे मराठीकरण करताना किंवा मराठी वाक्यांचे अन्य भाषेत भाषातंर करताना अनेक गमतीजमती होत आहेत. मराठी म्हणी आणि वाक्प्रचारांचे भाषांतर म्हणजे ' चकटफू हसवणूकीचा कार्यक्रम ' आहे. पण यात दुरुस्ती स्वीकारण्याची तयारी गुगलने दाखवली आहे. 

त्यासाठी त्यांनी ट्रान्स्लेटर टूलकिट आणि शो फ्रेजबुक असे दोन पर्याय दिले आहेत. तसेच ज्या शब्दांचे भाषांतर होत नसेल त्यावर ' क्लिक ' करून ते भाषांतर गुगलकडे पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधांचा जेवढा वापर वाढले तेवढे हे भाषांतर अधिक अचूक होईल. एकाच शब्दाचे विविध समनार्थी पर्यायही सुचविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ water या इंग्रजी शब्दासाठी जल , समुद्र , पाणी पाजणे असे पर्याय दाखविण्यात येतात. अर्थातच त्यातही त्रुटी आहेत. पण गुगलला उशिरा का होईना सुचलेल्या या शहाणपणाचे स्वागत करायला हवे , असे इंटरनेट क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.