सोमवार, १८ मे, २०१५

मराठमोळे मुंबईकर निखिल देशपांडेने. अमेरिकन शासनव्यवस्था आणली मोबाइलवर

अमेरिकन शासनप्रणालीमधील सर्वसामान्यांसाठी असलेल्या हजारो सोयीसुविधा डेस्कटॉपवरून मोबाइलवर कल्पकतेने उपलब्ध करून देणारा दुवा आहेत मराठमोळे मुंबईकर निखिल देशपांडे. अमेरिकन शासनव्यवस्थेला सर्वसामान्यांशी जोडणाऱ्या निखिल यांच्या या बहुमोल कार्याची दखल अमेरिकेनेही घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांचा 'स्टेट स्कूप ५०' हा सन्मान देऊन प्रत्येक वर्षी अमेरिकेमध्ये गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी अमेरिकेतून आलेल्या ७५ प्रवेशिकांमधून निखील यांची निवड करण्यात आली. तंत्रज्ञानातील उदयोन्मुख युवा नेता आणि सर्जनशील संशोधक यासाठी निखिल देशपांडेंचा गौरव करण्यात आला आहे. मुंबईतल्या पार्ले टिळक शाळेचे विद्यार्थी असणारे निखिल अमेरिकेच्या शासनप्रणालीमधील जॉर्जिया स्टेट पोर्टलमध्ये चीफ स्ट्रॅटेजी डायरेक्टर हा पदभार सांभळतात. शासनाच्या विविध सेवासुविधांची माहिती या स्टेट पोर्टलमधील ७० वेबसाइट्सवरून दिली जाते. या वेबसाइट्सवर जाऊन संबधित विभागाची माहिती घेणे, त्याची नोंद ठेवणे हे सामान्यांसाठी अनेकदा किचकट व वेळखाऊ काम असते. 'सरकारी काम अन् दहा महिने थांब' हा अनुभव अमेरिकेन नागरिकांनाही येत असतोच. इंटरनेटवरील या ७० वेबसाइट्स धुंडाळण्यापेक्षा ही प्रणाली मोबाइलवर सोप्या सुटसुटीत पद्धतीमध्ये आणली तर शासनाच्या सुविधा सामान्यांपर्यंत सहज नेता येतील, असा विचार करून निखिलने हे पोर्टल मोबाइलवर आणले. पुलंचा नातू... पु.ल. चा लाडका नातू ही निखिल यांची अजून एक ओळख. पुलंचा पत्रव्यवहार, त्यांचे अप्रकाशित साहित्य, भ्रमंती अशा सर्वसामान्यांना ठाऊक नसलेल्या माहितीपर गोष्टींचा खजिना ते एका वेबसाइटवर उपलब्ध करून देणार आहेत. 'प्रबोधन' संस्थेचे सुनील वेळणकर आणि सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठी बहुमोल मदत केली आहे. ८ नोव्हेंबर रोजी, भाईंच्या जन्मदिवशी ही वेबसाइट सुरू करण्याचा निखिल यांचा मानस आहे.

शनिवार, ९ मे, २०१५

सायकलवरून जगभ्रमंती

दुचाकी सायकल तीही गियर नसलेली आणि सामानासह वजन फक्त १३० किलो. या सायकलवरून जगभ्रमंती करण्याची किमया केली आहे राजेश खांडेकर (४२) यांनी. आता ते सायकल चालवत थेट भारत ते ऑकलंड - न्यू झीलंड पर्यंत जाणार आहेत! हा तब्बल २१ हजार किलोमीटरचा प्रवास आहे. खांडेकर यांनी याआधी विविध देश आपल्या सायकलवरून पादाक्रांत केले आहेत. यंदा ते भारत ते न्यूझीलंड असा लांब पल्ल्याचा प्रवास करणार आहेत. भविष्यात संपूर्ण अमेरिका खंड म्हणजे थेट अर्जेन्टिना पासून ते कॅनडा पर्यंतचा सगळा प्रदेश सायकलवरुन फिरण्याचा विचार ते करत आहेत. मूळचे ठाणेकर असलेले आणि आपल्या वेडापायी अविवाहीत राहिलेले राजेश खांडेकर वर्तक नगर येथे दुकान चालवतात. या छोटेखानी व्यवसायातले उत्पन्न आणि मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर राजेश खांडेकर सायकलवरुन देशोदेशीची भ्रमंती करत आहेत. सायकल भ्रमंती दरम्यान तंबूत पंखा न लावता झोपणारे, प्रत्येक ठिकाणी फलाहार अथवा स्थानिक खाद्य पदार्थ खाणारे आणि पर्यटनाचा आनंद लुटणारे राजेश खांडेकर यांनी प्रवासादरम्यान अनेकदा खडतर अनुभव घेतले आहेत. सायकल बिघडल्यास स्वतःच दुरुस्त करता येते पण स्थानिक भाषा समजत नसल्यास संवाद साधणे हे अतिशय कठीण असल्याचे ते स्वतःला आलेल्या अनुभवांवरुन सांगतात.