शनिवार, ९ मे, २०१५

सायकलवरून जगभ्रमंती

दुचाकी सायकल तीही गियर नसलेली आणि सामानासह वजन फक्त १३० किलो. या सायकलवरून जगभ्रमंती करण्याची किमया केली आहे राजेश खांडेकर (४२) यांनी. आता ते सायकल चालवत थेट भारत ते ऑकलंड - न्यू झीलंड पर्यंत जाणार आहेत! हा तब्बल २१ हजार किलोमीटरचा प्रवास आहे. खांडेकर यांनी याआधी विविध देश आपल्या सायकलवरून पादाक्रांत केले आहेत. यंदा ते भारत ते न्यूझीलंड असा लांब पल्ल्याचा प्रवास करणार आहेत. भविष्यात संपूर्ण अमेरिका खंड म्हणजे थेट अर्जेन्टिना पासून ते कॅनडा पर्यंतचा सगळा प्रदेश सायकलवरुन फिरण्याचा विचार ते करत आहेत. मूळचे ठाणेकर असलेले आणि आपल्या वेडापायी अविवाहीत राहिलेले राजेश खांडेकर वर्तक नगर येथे दुकान चालवतात. या छोटेखानी व्यवसायातले उत्पन्न आणि मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर राजेश खांडेकर सायकलवरुन देशोदेशीची भ्रमंती करत आहेत. सायकल भ्रमंती दरम्यान तंबूत पंखा न लावता झोपणारे, प्रत्येक ठिकाणी फलाहार अथवा स्थानिक खाद्य पदार्थ खाणारे आणि पर्यटनाचा आनंद लुटणारे राजेश खांडेकर यांनी प्रवासादरम्यान अनेकदा खडतर अनुभव घेतले आहेत. सायकल बिघडल्यास स्वतःच दुरुस्त करता येते पण स्थानिक भाषा समजत नसल्यास संवाद साधणे हे अतिशय कठीण असल्याचे ते स्वतःला आलेल्या अनुभवांवरुन सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा